पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : संविधान दिनानिमित्त पिंपरी चौकातील भीमसृष्टी स्मारकात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची हमी दिली आहे. देशाच्या शासनव्यवस्थेला आधार देण्याबरोबरच नागरिकांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले समता, सामाजिक न्याय आणि बंधुतेचे विचार समाजजीवनात रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे बनसोडे म्हणाले. संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि संविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, डॉक्टर्स सेलच्या अध्यक्षा डॉ. मनीषा गरुड, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष कुणाल भोसले, युवराज पवार, हिराचंद जाधव, संदीप शिंदे, पुरुषोत्तम राऊत, अनिता सोनवणे, अनिता सावळे, आशाताई भोसले, गौरी नरसिंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.