मुंबई | ४ ऑक्टोबर २०२६ : विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे नागरिकांचे आयुर्मान वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे करण्याचा विचार व्हायला हवा, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. निवृत्तीनंतरची ‘तिसरी इनिंग’ समाजकार्य, राष्ट्रकार्य आणि सर्जनशील कार्यासाठी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ मुंबई येथे पार पडला. यावेळी अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सार्वजनिक जीवनातूनही निवृत्त झालो, असा न्यूनगंड ज्येष्ठांनी बाळगू नये. त्यांच्याकडील अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग पुढील पिढी घडविण्यासाठी व्हावा. तसेच पर्यावरण बदलाचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्येष्ठांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे ओक यांनी सांगितले.
या सोहळ्यात पुण्यातील मानव कांबळे यांच्यासह प्रकाश घादगिने (लातूर), बबन पाटणकर (ठाणे), भागीरथी बच्चेवार (नांदेड), वृषाली मगदूम (रायगड), जनसेवा फाउंडेशन (पुणे) आणि ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा (जळगाव) यांचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी ‘जनरेशन गॅप’ कमी करण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण पिढीमध्ये संवाद व मैत्रीपूर्ण संबंध वाढण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटाचारी यांनी पार्किन्सन्स आजाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कान्हेकर यांनी केले. निवड समितीच्या वतीने ॲड. प्रमोद ढोकले यांनी विचार मांडले. दीपिका शेरखाने यांनी आभार मानले, तर प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले.