पुणे | ७ ऑक्टोबर २०२६ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांचा पुणे जिल्ह्याचा द्वितीय दौरा शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या दौऱ्यात पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन त्या ठिकाणच्या कामकाजाची पाहणी केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११.३० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर विविध मतदान केंद्रांना भेटी देण्यात येणार असून सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे दौऱ्याची सांगता होणार आहे.
दौऱ्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. यावेळी BLO आणि मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाची माहिती घेतली जाणार आहे.
मतदार यादीसंदर्भात अडचणी किंवा तक्रारी असलेल्या नागरिकांनाही या दौऱ्यादरम्यान मतदार यादी निरीक्षकांकडे आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या NGRS पोर्टलवर तसेच १९५० या कॉल सेंटर क्रमांकावर नोंदविता येणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.