गुरुपौर्णिमेनिमित्त चिंचवडमधील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला १ लाखांचा मदतनिधी
'भाजप'चे शहर संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून दिली मदत
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवडचे संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, क्रांतिवीर चापेकर स्मारक आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयाच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आर्थिक स्वरूपात देणगी अर्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संकुलाचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर ॲड. शेडगे यांनी विद्यार्थी संकुलासाठी ५१ हजार रुपये, विद्यालयासाठी ५१ हजार रुपये अशी एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच, गोशाळेसाठी एक टन चाऱ्याचीही मदत केली आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात ही देणगी पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना ॲड. मोरेश्वर शेडगे म्हणाले, "गुरुंचे आशीर्वाद आणि समाजसेवेची प्रेरणा हीच खरी संपत्ती आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा संकल्प केला होता. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरुचरणी कृतज्ञतेची ही छोटीशी अर्पणभावना व्यक्त करता आली, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करीत आहे. या कार्याला मी हातभार लावला, याचे समाधान वाटते." यावेळी गुरुकुलमच्या वतीने अॅड. शेडगे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड कार्यवाह नरेंद्र पेंडसे, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे विभाग संघटन मंत्री प्रतीक पावडे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, 'ब' प्रभाग समितीचे अध्यक्ष मंदार देशपांडे, सामाजिक समरसता साहित्य परिषदेच्या शोभा जोशी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका चंद्रकला शेडगे, भाजप राज्य परिषदेचे सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार मुरडे, रवींद्रजी देशपांडे, भाजपा सरचिटणीस मधुकर बच्चे, राजाभाऊ मासुळकर, अजित कुलथे, दत्ताभाऊ चिंचवडे, कैलास सानप, नंदूकाका भोगले, सचिन शिवले, गोपाळ काका भसे, वसंत गुजर, श्रीकांत जोशी, गणेश ढाकणे, अमर कापसे, खंडूदेव कठारे, मनोज तोरडमल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.