पिंपरी : स्लीपर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पुण्यातील अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेडने महत्त्वाची कामगिरी केली आहे. कंपनीच्या ‘लेगसी’ श्रेणीतील 13.5 मीटर लांबीच्या वातानुकूलित स्लीपर कोचला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून प्रमाणपत्र मिळाले आहे. बस सुरक्षेसंदर्भातील AIS-052, AIS-119 आणि AIS-153 या तीन राष्ट्रीय मानकांची पूर्तता केल्यानंतर या कोचला मान्यता देण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यातील नेरे येथील कंपनीच्या उत्पादन केंद्रात या स्लीपर कोचची निर्मिती केली जाते. या श्रेणीत पूर्ण स्लीपर आणि सीटर्स-कम-स्लीपर असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सजी वर्की यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्र सरकारने स्लीपर बसच्या सुरक्षेसाठी नियम अधिक कठोर केले आहेत. बसची संरचनात्मक मजबुती, प्रवाशांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था यांना या नियमांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार अजिलच्या ‘लेगसी’ कोचमध्ये प्रत्येक बर्थजवळ आपत्कालीन खिडक्या, छतावरील एक्झिट हॅच, स्वतंत्र आपत्कालीन दरवाजा, काच फोडण्यासाठी हातोडे आणि अग्निरोधक अंतर्गत साहित्य अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
AIS-052 अंतर्गत बसच्या बॉडीची मजबुती, दरवाजे, खिडक्या आणि प्रकाशव्यवस्थेचे निकष निश्चित केले आहेत. AIS-119 मध्ये स्लीपर कोचमधील बर्थची रचना आणि आपत्कालीन सुरक्षेच्या अतिरिक्त तरतुदींचा समावेश आहे. तर सप्टेंबर 2025 पासून नव्या बससाठी लागू झालेल्या AIS-153 मानकांमुळे अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या व्यवस्थेचे निकष अधिक कडक झाले आहेत.
अजिल फायबरटेकने 2002 मध्ये एफआरपी घटकांच्या निर्मितीपासून व्यवसायाला सुरुवात केली. रुग्णवाहिका, मोबाइल वैद्यकीय युनिट्स, अग्निशमन वाहने, पोलीस व संरक्षण दलांसाठी विशेष वाहने अशा विविध वाहनांची निर्मिती कंपनीकडून केली जाते. 2022 मध्ये कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर २०२५ मध्ये कंपनीने रिटेल बस निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.
5 सप्टेंबर 2026 रोजी कंपनीने अद्ययावत उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे दरवर्षी 1,500 विशेष वाहनांच्या बॉडी निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे. आगामी आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये 150 हून अधिक बसच्या बॉडी निर्मितीचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या प्रमाणपत्रामुळे राष्ट्रीय सुरक्षा मानकांची पूर्तता करणारा स्लीपर कोच बस ऑपरेटर्ससाठी उपलब्ध झाला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.