पिंपरी-चिंचवड : जुन्या वादातून जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना गहुंजे परिसरात घडली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात चारजणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीननुसार, उत्तरप्रदेशचा रहिवासी राहुल विजय दुबे (वय 24, सध्या रा. शिरगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (22 नोव्हेंबर) 5.30च्या सुमारास गहुंजे येथील मंदिराजवळील रस्त्यावर त्याला मारहाण करण्यात आली.
शिरवाग येथील रुपेश राजपुत (वय 34), विनायक राजपुत (वय 26), योगेश राजपुत (वय 28) आणि रोहन ऊर्फ बंटी राजपुत (वय 24) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात राहुल आणि रुपेश राजपुत यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून रुपेश याने गहुंजे येथून घरी जाणाऱ्या रस्त्यावर राहुलला अडवले. त्याच्या वाहनाची चावी काढून घेत त्याच्या वडिलांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली.
शिवाय राहुलचे आई-वडील घटनास्थळी आल्यानंतर रुपेश याने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर इतर तिघांना फोन करून बोलावून घेतले. चौघांनी मिळून फिर्यादी यांना लोखंडी पाइप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2) 352, 351(2), 126 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार दिघे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.