पिंपरी चिंचवड : ऑनलाइन डिलिव्हरीच्या ऑर्डरवरून झालेल्या वादातून एका 21 वर्षीय डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माबितीनुसार, ताथवडे परिसरातील जीवननगर येथील महिंद्रा हॅपिनेस सोसायटीसमोर डिलिव्हरी बॉयवर हल्ला करण्यात आला. फ्लिपकार्ट मिनिट्स कंपनीच्या ऑर्डरवरून डिलिव्हरी बॉयला दोन तरुणांनी शिवीगाळ केली होती. याबाबत डिलिव्हरी बॉयने आपल्या मित्राला याची माहिती दिली.
रविवारी रात्री डिलिव्हरी बॉय कंपनीची ऑर्डर टाकून जीवननगर परिसरातून जात असताना आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्यांना अडवले. ऑर्डर का टाकत आहेस, असे विचारत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. हा वार चुकवताना डिलिव्हरी बॉयच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि उजव्या हाताच्या करंगळीवर वार झाल्याने फ्रॅक्चर आणि गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चिखलीतील शुभम सुदाम राऊत (वय 28) आणि विक्रांत विष्णू भोसले (वय 23) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 352, 351(2)(3) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक दराडे पुढील तपास करत आहेत.