पिंपरी-चिंचवड : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची टेम्पोमधून अवैध वाहतूक केल्याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत टेम्पोसह 9 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री 9.40च्या सुमारास खालुंब्रे गावातील एचपी पेट्रोल पंपाशेजारील गल्लीत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई रोहित संजय शिंत्रे (वय 31) यांनी तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असणारा निशांत रमाकांत उपाध्याय (वय 23, सध्या रा. खालुंब्रे) आणि दयाशंकर दुबे ऊर्फ दयाशंकर द्विवेदी (वय 39, रा. देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत उपाध्याय याने दयाशंकर दुबे याच्या सांगण्यावरून मारुती सुझुकी सुपर कॅरी या छोट्या मालवाहतूक टेम्पोमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला बाळगला होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची अवैधरीत्या खरेदी करून ते जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत आढळून आले.
याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 271, 272 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जवळे पुढील तपास करत आहेत.