पिंपरी-चिंचवड : आळंदी येथे भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकासह दोघांना दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आळंदीतील पीएमटी चौकातील गणेश मंदिरासमोर ही घटना घडली. महादेव दौलत कोळेकर (वय 65) हे साताऱ्यातील फटलण तालुक्यातील नांदल गावचे रहिवासी आहेत. सध्या ते आळंदीत वास्तवास असून त्यांना दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले.
महादेव कोळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पांडुरंग कृष्णा चोपडे (वय 55) याच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ते देखील आळंदीत वास्तवास असून मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यातील दानोळीचे रहिवासी आहेत.
तक्रारदार महादेव कोळेकर आणि पांडुरंग चोपडे यांच्या घटनेच्या एक दिवस आधीत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून पांडुरंग यांनी रस्त्यावरील दगड उचलून महादेव यांना मारहाण केली. या मारहाणीत महादेव यांच्या डोक्याला डाव्या हाताला दुखापत झाली.
तसेच तक्रारदार महादेव यांचे मित्र संतोष रंगनाथ चालक (वय 41) यांनाही आरोपी पांडुरंग यांनी दगडाने मारहाण केली. त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार काठे पुढील तपास करत आहेत.