पुणे : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते, सूचना आणि भूमिका जाणून घेण्यासाठी पुणे महसूल विभागात रविवार, 29 नोव्हेंबर 2026 रोजी विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत संबंधित गट, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात ही जनसुनावणी होणार आहे. पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वेळा निश्चित करण्यात आल्या असून, त्यानुसार नागरिकांना समितीसमोर आपली भूमिका मांडता येणार आहे.
जनसुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून, 29 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी सकाळी 10 ते 11, सांगली जिल्ह्यासाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30, सोलापूर जिल्ह्यासाठी दुपारी 1 ते 2, कोल्हापूर जिल्ह्यासाठी दुपारी 3 ते 4, तर पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत जनसुनावणी होणार आहे. नागरिकांनी निर्धारित वेळेच्या एक तास आधी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे.
जनसुनावणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
समान नागरी कायद्याबाबतच्या समितीचे सदस्य पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना समितीसमोर प्रत्यक्ष मते मांडता येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे.
प्रत्यक्ष जनसुनावणीत सहभागी न होता केवळ ऑनलाइन पद्धतीने मते नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायद्याच्या अधिकृत पोर्टलवर नागरिकांना ३७ मुद्द्यांबाबत आपली मते नोंदविता येणार आहेत.
समान नागरी कायद्याबाबत नागरिकांना आपली भूमिका आणि सूचना मांडण्याची संधी या जनसुनावणीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
संबंधित हितसंबंधित गट, सामाजिक संस्था, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी जनसुनावणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.