पिंपरी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांच्या निधनानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी करून अंतिम अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान, प्रकरणाच्या तपासातील विलंब, एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी दिलेल्या नकाराचा निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा संतप्त सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार टिका करण्यात आली.
28 जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यानंतर, आमदार रोहित पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, सीआयडी तपासाचे कारण देत पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
अपघाताला अनेक महिने उलटूनही एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) आणि संबंधित यंत्रणांचा अंतिम चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या विलंबाबाबतही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अपघाती विमान कंपनी व्हीएसआर व्हेंचर्स आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या विमान कंपनीच्या मालकासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांटे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याचा उल्लेख करत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करून त्याचा अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणीही करण्यात आली.
सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा मंत्री नितेश राणे यांच्याकडून प्रश्न विचारणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत सरकारला प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असून, अशा धमक्यांमधून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली.
विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांचाही दाखला देण्यात आला. सध्या विरोधकांच्या वक्तव्यांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची भूमिका घेतली जात असल्याने सत्ताधाऱ्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनी नकार का दिला? या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे का सोपवला जात नाही? संबंधित विमान कंपनीच्या मालकाशी असलेल्या संबंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण का दिले नाही? चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप जनतेसमोर का आणण्यात आलेला नाही? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
तपासातील विलंब, प्रशासकीय अपयश आणि राज्यातील कथित दडपशाहीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
या आंदोलनात शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, शहर सरचिटणीस जयंत शिंदे, प्रवक्ते तथा उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, अमोल गव्हाणे, अनिल भोसले, ॲड. सोपान पाटील, सचिन चावरे, मयूर जाधव, अमोल पाटील, माणिक जैद, विवेक विधाते, सुनील पवार, राजू खंडागळे, नितीन मोरे, अक्षय घोडके, आशिष पांढरे, शौक कांबळे, मंगेश असवले, अक्षय कांबळे, सागर दिघाडे, राहुल धनवे, नितीन गुंगासे आणि परमेश्वर गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.