पिंपरी : मराठी रंगभूमी, लोककला आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ कलावंत, अभिनेते व दिग्दर्शक सुहास दामोदर जोशी यांचा महापालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला. आज (20 नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सुहास जोशी यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी, लोकनाट्य, एकांकिका, निवेदन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 50 हून अधिक नाटके आणि 40 हून अधिक एकांकिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल बाज, बोलीभाषेतील सहजता आणि व्यक्तिरेखांचे वास्तववादी सादरीकरण ही त्यांच्या अभिनयाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा आणि विविध सांस्कृतिक महोत्सवांमधील त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना 50 हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. लोककला संमेलने, अभिजात मराठी सप्ताह आणि कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा, साहित्य व लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठीही योगदान दिले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून ते राज्य नाट्यस्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून ते नवीन कलाकारांना मार्गदर्शनही करतात. त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेचा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान करणे ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांनी जोशी यांना त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व संस्कृती समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत को-हाळे, नगरसदस्या मनिषा चिंचवडे आदी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.