माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहिम
पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जंयतीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कॅटलफिडस प्रा.लि.च्यावतीने एमआयडीसी परिसरात बिरोबा मंदिर परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्याच्या प्रांरभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला एमआयडीसी कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, एमआयडीसी कार्यकारी अभियंता विजय पेटकर, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती कॅटल फीड्स चे संचालक सचिन माने, सरपंच काका वनवे तसेच बिरोबा मंदिर समितीचे विश्वस्त, ग्रामस्थ व बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्यासह बारामती औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. यावेळी एमआयडीसी परिसरातील विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये अशोकाच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली, अशी माहिती बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग, पुणे यांच्यावतीने ‘हरित महाराष्ट्र अभियान’अंतर्गत बारामती तालुक्यात साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला; त्याचा शुभांरभ अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाचा सामना करणे आणि तालुक्यातील हरित क्षेत्र वाढवणे हा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्ते, बांधकाम स्थळे, महामार्गाकडेच्या जागा, सरकारी इमारतींचा परिसरात आणि उपलब्ध खुल्या जागी ही झाडे लावण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंता अमोल पवार यांनी सांगितले, ''बारामती तालुक्यात ७ हजार ५०० झाडांच्या लागवडीद्वारे हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये देशी प्रजाती जसे कडूनींब, पिंपळ, वड, करंज, शिसम, बाभूळ, आंबा, जांभूळ इत्यादी झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमाद्वारे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी देखील यंत्रणा उभारण्यात आली आहे. कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.''