मगर ये तो कोई न जाने हे मेरी नौकरी है कहॉं....., 'मोदी सरकार जवाब दो...'
पिंपरीमध्ये आंदोलन करुन शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी नोंदवला दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग
पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ - 'पापा केहेते हे बडा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने हे मेरी नौकरी है कहॉं...' असं उपहासात्मक गाणं गात सरकारविरोधी घोषणाबाजी करत पिंपरी-चिंचवडमधील असंख्य विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी गुरुवारी (ता. २३) दिल्लीमध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विद्यार्थ्यांच्या 'मोदी सरकार जवाब दो...' घोषणांनी दणाणून गेला.
देशातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलानात दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहरातील विद्यार्थी एकवटले. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार का केला, पेपरफुटीच्या घटनांना जबाबदार कोण, देशातील वाढत्या बेरोजगारीला जबाबदार कोण... असे संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी सरकारला विचारले. 'मोदी सरकार जवाब दो' हीच घोषणा परिसरात घुमत राहिली. 'साऊचा इतिहास सर्वांना सांगणार, सर्वांना सांगणार'...असा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने झालेले हे आंदोलन 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हाच बाबासाहेबांचा संदेश देत असल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कॉकरोच जनता पार्टी, वंचित बहुचन आघाडी आणि शहरातील संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.