विधायक -  जाणून घेऊया आकुर्डी येथील  राजा शिवछत्रपती कुस्ती संकुलाविषयी

विधायक - जाणून घेऊया आकुर्डी येथील राजा शिवछत्रपती कुस्ती संकुलाविषयी

विधायक - सदरामध्ये जाणून घेऊया आकुर्डी येथील  राजा शिवछत्रपती कुस्ती संकुलाविषयी 

राजा शिवछत्रपती कुस्ती संकुलातून घडत आहेत नवे पैलवान .......

आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत आकुर्डीतील पैलवान राजेश काळभोर यांनी कुस्तीक्षेत्रात मोठी कामगिरी केली आणि नवीन पैलवान घडवण्यासाठी त्यांनी सन २००८ पासून आकुर्डी गावातील तालमीत नव्या मल्लांसाठी प्रशिक्षण सुरु केले. कुस्तीबद्दल असलेले त्यांचे अपार प्रेम, निष्ठा आणि समर्पण पाहून सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे यांनी पुढाकार घेत २०२४ मध्ये “राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल” उभे केले. 

या कुस्ती संकुलाच्या उभारणीचा प्रवासाची गोष्ट अशी की,  पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी गावाला कुस्तीगीरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच मातीत कै. पैलवान बाळासाहेब काळभोर या महान मल्लाचा जन्म झाला. कुस्ती आणि कबड्डी या दोन्ही खेळांमध्ये १९७२ आणि १९७३ या सलग दोन वर्षांत राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आणि आकुर्डीचे नाव देशपातळीवर पोहोचवले.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी बजाज ऑटो येथे नोकरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांचे बंधू पैलवान रघुनाथ काळभोर यांनीही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळाली. कै. पैलवान बाळासाहेब काळभोर यांचा हाच वारसा पुढे त्यांचे चिरंजीव पैलवान राजेश काळभोर यांनी समर्थपणे पुढे नेला. लहानपणापासूनच त्यांनी आखाड्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गावातील जत्रांमधील कुस्तीच्या दंगलींमध्ये हा पैलवान प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, १९९६ मध्ये म्हाळसाकांत विद्यालयाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्यांनी कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. पुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे तब्बल तीन वेळा प्रतिनिधित्व केले. याशिवाय दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धा आणि एकदा ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. राज्यस्तरीय ग्रीको-रोमन स्पर्धेत कांस्यपदक मिळवत त्यांनी आपल्या यशाची घोडदौड कायम ठेवली.

पैलवान घडवण्यासाठी लागणारा खुराक, सराव आणि जिद्द यामागे त्यांच्या मामा कै. विठ्ठल बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब बोराडे आणि माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे राजेश काळभोर आवर्जून सांगतात. राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना त्यांच्या लक्षात आले की पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सुविधा नसल्यामुळे अनेक गुणवंत खेळाडू पुढे येऊ शकत नाहीत. गावातील जत्रेतील कुस्तीपासून सुरू होणारी खेळाडूंची कारकीर्द राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचत नाही, ही खंत त्यांना सतावत होती.

याच जाणिवेतून त्यांनी सन २००८ पासून आकुर्डी गावातील तालमीत नव्या मल्लांना घडवण्यास सुरुवात केली. कुस्तीबद्दल असलेले त्यांचे अपार प्रेम, निष्ठा आणि समर्पण पाहून अनुप मोरे यांनी पुढाकार घेत २०२४ मध्ये “राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल” उभे केले.

दरम्यान, २०२१ मध्ये १५५ किलो वजनाच्या या भरभक्कम शरीरयष्टीच्या पैलवानाला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले. मात्र या आजारापुढे न ढासळता त्यांनी जिद्दीने सामना केला. आजाराशी दोन हात करत नव्या उमेदीने ते पुन्हा आखाड्यात उभे ठाकले. त्यांच्या या संघर्षाने अनेकांना प्रेरणा दिली.

काळभोर कुटुंबाची तिसरी पिढीही मातीच्या सेवेत पैलवान राजेश काळभोर यांचे चिरंजीव पैलवान स्वराज काळभोर आणि पैलवान आदित्य काळभोर यांनीही कुस्तीचा वारसा पुढे चालवला आहे.

पैलवान स्वराज काळभोर अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तसेच विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांसाठी चंदीगड आणि चेन्नई येथे सहभाग घेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

श्री अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन आणि पैलवान राजेश काळभोर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू करण्यात आलेल्या “राजा शिवछत्रपती कुस्ती संकुला”ची यशस्वी घोडदौड सध्या सुरू आहे. अनुप मोरे यांनी दोन होतकरू पैलवान दत्तक घेतले असून स्वराज काळभोर यांना महाराष्ट्र केसरी बनवण्यासाठीही ते मोलाचे योगदान देत आहेत.

या कुस्ती संकुलासाठी शहरातील अनेक कुस्तीप्रेमी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी भरभरून मदत केली. खासदार श्रीरंग आप्पा बारणे  आमदार महेशदादा लांडगे आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी कुस्ती संकुलासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

तसेच विधानसभा अध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅट उपलब्ध करून दिली, तर संदीप वाघेरे यांचेही मोलाचे योगदान लाभले.

आकुर्डीच्या मातीतील हा कुस्तीचा वारसा आजही नव्या जोमाने पुढे जात असून काळभोर कुटुंब आणि राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल अनेक नवोदित मल्लांना घडवण्याचे कार्य करत आहे.

शिवछत्रपती कुस्ती संकुल हे निवासी स्वरूपाचे संकुल असून येथे पैलवानांसाठी राहण्याची प्रशस्त आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. खेळाडूंना उत्कृष्ट सराव करता यावा यासाठी येथे मॅट विभागासोबतच पारंपरिक मातीतील आखाड्याचीही सुविधा उपलब्ध आहे. तसेच व्यायामासाठी अत्याधुनिक साधने आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पैलवानांच्या शारीरिक क्षमतेसाठी आवश्यक असलेला दर्जेदार खुराक दररोज पुरवला जातो. या संकुलामध्ये पैलवान राजेश काळभोर स्वतः खेळाडूंना मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवाचा आणि मेहनतीचा लाभ अनेक होतकरू मल्लांना होत आहे.याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले नामांकित पैलवान वेळोवेळी संकुलाला भेट देत खेळाडूंना मार्गदर्शन करतात. त्यामुळे येथील मल्लांना उच्चस्तरीय प्रशिक्षण, प्रेरणा आणि स्पर्धात्मक वातावरण मिळत आहे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories