पुण्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या-पानटपऱ्या रात्री १० नंतर पूर्णपणे बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश
पुण्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या-पानटपऱ्या रात्री १० नंतर पूर्णपणे बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश
पुणे, ता. २६ - पुण्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या , पानटपऱ्या रात्री दहा वाजल्यानंतर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. परवानाधारक हॉटेल-रेस्टॉरंट, पब आणि बार मात्र नियमांच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास पोलिसांनी मुभा दिली आहे. रात्रीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी पुण्यात प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक भागांमध्ये मध्यरात्रीनंतरही खाद्यपदार्थांच्या गाड्या, पान टपऱ्या सुरु असल्याचे समोर आले. डेक्कन फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, विमाननगर, खराडी, कोंढवा, हडपसर, औंध परिसरातील या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मध्यरात्रीही ग्राहक येतात. त्यामुळे, वाहतूक कोंडी, वादाचे प्रसंग निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी रात्री १० नंतर खाद्यपदार्थांच्या गाड्या , पानटपऱ्या बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र, या निर्णयानंतर व्यावसायिक संघटनांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध केला व निवेदन दिले. वैध परवानाधारक हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार यांच्यावर कोणतीही बंदी घातली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांनी दिले आहे. परवानाधारक आस्थापना अधिकृत वेळेनुसार सुरु राहू शकतात. रस्त्यांवर किंवा दुकानाबाहेर टेबल-खुर्च्या मांडून सुरु असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. प्रत्येक व्यावसायिकाने परवानगीच्या मर्यादेत राहून व्यवसाय करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.