कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूकीत बदल ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूकीत बदल ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

आळंदी | २६ नोव्हेंबर २०२६ : आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त शहरातील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, 1 डिसेंबरच्या पहाटे 01 वाजल्यापासून ते 8 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आळंदी शहरात येणाऱ्या वाहनांना सहा मार्गांवर प्रवेशबंदी असणार आहे. यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

यंदा ४ डिसेंबरला कार्तिकी एकादशी, तर ६ डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे. आळंदीत दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि भंडारा डोंगराकडे जातात. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी वाहतुकीत बदल जाहीर केले आहेत.  शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळितपणे राहावी या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1)(ए)(बी) 116(4) आणि 117 अन्वये हे बदल करण्यात आले आहेत.

पुण्याहून येणारी वाहने चऱ्होली फाटा चौकात, तर मोशीकडून येणारी वाहने डुडुळगाव जकात नाक्यावर थांबवली जातील. चिंबळीकडून येणाऱ्या वाहनांसाठी केळगाव चौक आणि बोपदेव चौक, तर चाकणच्या आळंदी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी इंद्रायणी रुग्णालयाजवळ प्रवेशबंदी असेल. वडगाव घेणंदकडून येणारी वाहने विश्रांतवड येथे, तर मरकळकडून येणारी वाहने धानोरे फाटा आणि पीसीएस चौकात थांबवली जातील.

मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, चाकणमधील आळंदी फाटा, माजगाव फाटा आणि भोसे फाटा येथून आळंदीकडे जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल. पुणे-दिघी मॅगझीन चौक, मरकळ आणि शेल पिंपळगाव-वडगाव घेणंदमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांनाही निर्बंध लागू राहतील.

वाहनचालकांनी नेहमीच्या मार्गानुसार जय गणेश साम्राज्य चौक-अलंकापुरम, भोसरी-मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर किंवा कोयाळी-मरकळ या पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील देहूगाव कमानीकडून येणारी वाहतूक भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण आणि कॅनबे चौक या मार्गाने वळवली जाणार आहेत. कॅनबे चौकातून देहूगावात अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाट्याकडील अवजड वाहतुकीसाठी एच.पी. चौकाचा पर्याय आहे. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील. त्याऐवजी परंडवाल चौक आणि साईराज चौकातून भैरवनाथ चौकाकडे जाता येईल.

पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. देहूगाव, मोशी आणि हवालदारवस्ती फाट्याकडून येणाऱ्यांसाठी तळेकर पाटील चौकाच्या दक्षिणेला आणि उत्तरेला वाहनतळावर वाहने उभी करावीत. चिंबळी फाट्याकडून येणाऱ्यांनी बोपदेव चौकातील मुंगसे पार्किंगचा, तर चाकणकडून येणाऱ्यांनी इंद्रायणी रुग्णालयासमोरील वाहनतळाचा वापर करावा.

वडगाव घेणंद आणि शेल पिंपळगावकडून येणाऱ्यांनी विश्रांतवड, तसेच वडगाव चौकातील नगरपरिषदेचे वाहनतळाचा वापर करावा. मरकळकडून येणाऱ्यांसाठी पॉलिबाँड कंपनीसमोरील गावडे पार्किंग, प्लुमेरिया मंगल कार्यालय आणि चऱ्होली बैलगाडा घाट येथे व्यवस्था आहे. पुण्याकडून येणाऱ्यांसाठी मुक्ताई मंगल कार्यालयासमोर वाहनतळ असेल.

देहूगावकडे जाणाऱ्या बस डुडुळगाव जकात नाक्यावरून, पुण्याकडे जाणाऱ्या बस चऱ्होली फाट्यावरून, तर वाघोली-शिक्रापूरकडे जाणाऱ्या बस धानोरे फाटा चौकातून सुटतील. चाकणकडील एसटीसाठी हनुमानवाडीत इंद्रायणी रुग्णालयाजवळ, विशाल हॉटेलसमोर थांबा असेल. शिक्रापूर, शेल पिंपळगाव आणि नगरकडील एसटीसाठी वडगाव रस्त्यावरील विश्रांतवड फाटा हा थांबा निश्चित केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories