आळंदीत पेट्रोल पंपावर चालकाला मारहाण; 5 जणांवर गुन्हा दाखल

आळंदीत पेट्रोल पंपावर चालकाला मारहाण; 5 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : आळंदी येथील मरकळ रस्त्यावरील घुंडरे पेट्रोल पंपावर गाडी हटवण्याच्या वादातून एका चालकाला गाडीतून बाहेर ओढून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चालकाला लोखंडी बक्कलने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. या प्रकरणी 5 जणांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान विनायक आंधळे (वय 31, रा. कृष्णा आयकॉन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय संजय लहाने (वय 20) करण दत्ताराव ढगे (वय 23), मोन्या ऊर्फ जय बाबाजी ठुबे (वय 20, तिघेही राहणार आळंदी) आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 23 नोव्हेंबरच्या रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. आंधळे हे गाडीत सीएनजी भरून प्रवासी मिळण्याची वाट पाहत होते. त्यावेळी ढगे याने त्यांना पंपावरून गाडी हटवण्यास सांगितले. आंधळे यांनी त्याचे कारण विचारले असता ढगे याने त्यांची कॉलर पकडून त्यांना गाडीतून बाहेर ओढले आणि मारहाण करण्यास सुरूवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर लहाने, ठुबे आणि आणखी दोन जणांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीदरम्यान लहाने याने आंधळे यांना जमिनीवर पाडून पट्ट्याच्या लोखंडी बक्कलने त्यांच्या डोक्यात मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुन्हा या परिसरात गाडी घेऊन न येण्याची धमकीही देण्यात आली. या झटापटीत आंधळे यांच्या कानातील सोन्याची बाळी पडून गहाळ झाली.

आळंदी पोलिसांनी 24 नोव्हेंबर रोजी बीएनएस कलम 118(1), 189(2), 191(2), 352, 351(2), 324(4) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories