पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो लाईन 3 वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून या दोन्ही स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
या दोन्ही स्थानकांना रेल्वे सुरक्षा मंडळाकडून आवश्यक मंजुरी मिळाली असून ती प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बालेवाडी आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात एकूण 23 स्थानकांपैकी 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती.
आता बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके सुरू झाल्यानंतर कार्यान्वित स्थानकांची संख्या 19 वर पोहोचणार आहे. या मार्गावरील उर्वरित चार स्थानके देखील लवकरच सुरू करण्यात येतील.
प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या मार्गावरून दररोज जवळपास 50 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. विशेषतः हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी मेट्रो हा दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
बालेवाडी परिसरातील दोन स्थानके कार्यान्वित झाल्यामुळे स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि नोकरदारांना मेट्रो सेवेचा थेट लाभ घेता येणार आहे. या स्थानकांच्या समावेशामुळे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
हिंजवडी आणि शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोच्या माध्यमातून जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नव्या दोन स्थानकांमुळे या मार्गावरील मेट्रो सेवेची व्याप्ती आणखी वाढणार आहे.