पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटींचा दंड? भरती प्रक्रियेतही होणार मोठा बदल

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटींचा दंड? भरती प्रक्रियेतही होणार मोठा बदल

मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीन दुसरा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालानुसार, पेपरफुटी करणाऱ्यांवर किमान 10 कोटी रुपयांचा दंड, 10 वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. 

समितीच्या अध्यक्ष व सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या समितीने 23 नोव्हेंबर रोजी हा अहवाल सादर केला. या अहवालात कठोर कायदेशीर कारवाईसह उमदेवारांना आर्थिक दिलासा देणाऱ्या अनेक शिफारशींचाही समावेश आहे. 

यानुसार, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, 2024 मध्ये सुधारणा करून संघटित परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना 7 ते 10 वर्षांचा कारावासाची शिक्षा आणि किमान 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच गैरप्रकारांमुळे झालेल्या नुकसानीची वसुली आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याचेही प्रस्तावित आहे.

परीक्षेत अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना 5 ते 10 वर्षांचा कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. गैरप्रकारांमध्ये सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना 2 कोटी रुपयांपर्यंत दंड आणि 8 वर्षांची बंदी, तर संबंधित संस्थांच्या दोषी संचालकांना व व्यवस्थापनातील व्यक्तींना 5 ते 10 वर्षांचा कारावास आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित आहे.

गंभीर परीक्षा गैरप्रकारांच्या तपासासाठी स्वतंत्र विशेष कृती दल (Special Task Force) स्थापन करण्याचे समितीने सुचविले आहे. तसेच प्रकरणांचा जलद निकाल लावण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचेही सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यांमध्ये अपर पोलीस अधीक्षक, तर पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

याशिवाय समितीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत गैरप्रकार झाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी शासकीय विभागांनी दरवर्षी सप्टेंबरअखेर रिक्त पदांची मागणीपत्रे आयोगाकडे पाठवावीत, तर आयोगाने ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध करावे, असे सुचविण्यात आले आहे. उमेदवारांना प्रत्येक परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत, यासाठी महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी (One-Time Registration) सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

याशिवाय त्रिस्तरीय परीक्षा नियंत्रण केंद्रे, जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी परीक्षा शाखा, जिल्हास्तरीय समन्वय समिती, परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक, प्रत्येक परीक्षेसाठी सुरक्षा आराखडा आणि स्वतंत्र सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या सर्व शिफारशी उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाच्या विचारार्थ सादर केल्या आहेत. त्यामुळे या प्रस्तावांवर शासन काय निर्णय घेते आणि त्यांची अंमलबजावणी कधी होते, याकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories