शरणकुमार लिंबाळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी; आमदार शंकर जगतापांकडून सत्कार

शरणकुमार लिंबाळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी; आमदार शंकर जगतापांकडून सत्कार

पिंपरी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निवडीबद्दल आमदार शंकर जगताप यांनी लिंबाळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मराठी साहित्यविश्वात राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. लिंबाळे यांना शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे, ही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळखीचा गौरव झाला असल्याची भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली.

डॉ. लिंबाळे यांनी आपल्या साहित्यकृतींमधून सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून तसेच ‘सनातन’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी उपेक्षित समाजाचे जीवन, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकला आहे. दलित साहित्याला व्यापक ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांच्याशी साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्यविश्वातील विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. लिंबाळे यांचे मार्गदर्शनही घेतले.

पिंपरी-चिंचवड शहरातील एका ज्येष्ठ साहित्यिकाला शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याने शहरातील नवोदित लेखक, साहित्यिक आणि युवा पिढीला प्रेरणा मिळेल. त्यांच्या साहित्यिक कार्यातून नव्या पिढीला मार्गदर्शन मिळेल, असा विश्वासही आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories