पिंपरी-चिंचवड : निगडी पोलीस ठाण्यात एका सहा वर्षी बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. दापोडीतील दोन नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूप आहे. या नागरिकांचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी कौतुक करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवाजी काची आणि अजय गोरख कांबळे या दोघांनी अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविले. या दोघांचेही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कौतुक केले असून पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित बालिकेचा शोध सुरू होता.
दरम्यान, अनिल शिवाजी काची (रा. दापोडी) आणि अजय गोरख कांबळे (वय ४०, रा. दापोडी) यांना ही बालिका विसावा, दापोडी परिसरात खेळताना आढळून आली. दोघांनी बालिकेकडे तिच्या घराबाबत आणि पालकांबाबत विचारपूस केली. मात्र, बालिकेला केवळ कन्नड भाषा येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अशा परिस्थितीत दोघांनीही प्रसंगावधान राखत बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या मदतीमुळे बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत परिमंडळ क्रमांक १ चे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या हस्ते दापोडी पोलीस ठाण्यात अनिल काची आणि अजय कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नागरिकांना आपल्या परिसरात एखादे लहान मूल एकटे किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा प्रसंगी नागरिकांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि पोलिसांना केलेले सहकार्य समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन्ही नागरिकांच्या सतर्कतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.