पिंपरी | ७ ऑक्टोबर २०२६ : हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद आणि बदलत्या नात्यांमधील गुंतागुंत अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दोन नाटकांनी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगत आणली. ‘ऑल दि बेस्ट’ या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसवले, तर ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने आजच्या पिढीच्या प्रेम आणि विवाहाकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचा विनोदी पद्धतीने वेध घेतला. दोन्ही नाट्यप्रयोगांना रसिकांची मोठी गर्दी झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या अभिनयाने नाटकाला रंगत आली. विनोदी प्रसंगांसोबत शारीरिक अक्षमतेवर मात करून आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तसेच मैत्री आणि एकमेकांना साथ देण्याचे महत्त्व नाटकातून मांडण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सादर झाले. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयातून आजची पिढी प्रेम आणि लग्नाकडे कशी पाहते, लग्नाचा निर्णय घेताना असणारा संभ्रम, नात्यांमधील अपेक्षा आणि ‘कमिटमेंट’ स्वीकारताना येणाऱ्या अडचणींवर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले.
दोन्ही प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘ऑल दि बेस्ट’ने हास्य आणि सकारात्मकतेचा संदेश दिला, तर ‘वरवरचे वधू-वर’ने बदलत्या काळातील नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत रसिकांसमोर मांडली.
दरम्यान, गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’, ‘गजल आख्यान’, ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’, कवी वैभव जोशी यांचा ‘द मनमौजी’ आणि ‘म...मराठीचा’ हे कार्यक्रम होणार आहेत. नटसम्राट निळूफुले नाट्यगृहात ‘कथा वंगभंगाची’ नाटक आणि ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ कार्यक्रम होणार आहे.