वाकड | ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही लोखंडी कोयता बाळगणाऱ्या दोन तरुणांवर वाकड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. कावेरीनगर भाजी मंडईजवळ १९ वर्षीय तरुणाला, तर औंध-रावेत बीआरटी रोडलगत १८ वर्षीय तरुणाला कोयत्यासह पकडण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडईच्या दक्षिण बाजूच्या मोकळ्या मैदानात, वाकड येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई अभिषेक शरद मांडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी राम मर्ढेकर (वय १९, चिंचवडगाव) याला हातात लोखंडी कोयता बाळगताना पकडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी कारवाई त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी रोडच्या कडेला, भारत पेट्रोलियम पंपाच्या विरुद्ध बाजूस, ताथवडे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई कारभारी नामदेव पालवे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समर्थ तम्मा बंदपट्टे (वय १८ वर्षे बालाजीनगर, भोसरी) याला हातात लोखंडी कोयता बाळगताना पकडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३० सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. या आदेशाचा भंग करून दोघेही कोयते बाळगताना मिळून आल्याने त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही प्रकरणांत वाकड पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.