'दापोडी ते निगडी' या राष्ट्रीय महामार्गाला अण्णासाहेब मगर यांचे नाव देणार - महापौर रवी लांडगे
'दापोडी ते निगडी' या राष्ट्रीय महामार्गाला अण्णासाहेब मगर यांचे नाव देणार - महापौर रवी लांडगे
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनामध्ये कै. खासदार अण्णासाहेब मगर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
पिंपरी, ता. २७ - ''पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार असलेल्या कै. खासदार अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या दापोडी ते निगडीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव देण्यात येईल.'', अशी घोषणा महापौर रवी लांडगे यांनी नुकतीच चिंचवड येथे केली.
अण्णासाहेब मगर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त अंशुल प्रकाशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनामध्ये अण्णासाहेब मगर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महापौर बोलत होते. दापोडी ते निगडी पर्यंतचा महामार्ग देखभाल, दुरुस्ती व विकासासाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याने नामकरणासाठी अडचण येणार नाही. प्रशासनाशी बोलून लवकरच निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी सांगितले.
यावेळी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक शितल शिंदे, अनंत कोऱ्हाळे, अमित गावडे, नगरसेविका अरुणा लंगोटे, मा. नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
''सार्वजनिक जीवनात कार्य करीत आलेल्या सर्वांनी अण्णासाहेबांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे. अण्णासाहेबांना प्रत्यक्ष पाहता आले, त्यांचे भाषण ऐकता आले.'', असा अनुभव खासदार बारणे यांनी यावेळी सांगितला. ''माझे वडील ह.भ.प. पांडुरंग जगताप यांना अण्णासाहेबांचा सहवास लाभला. पंचायत समितीच्या माध्यमातून ते अण्णासाहेबांबरोबर काम करत असताना ते आम्हाला अण्णासाहेबांच्या आठवणी सांगत.'', असे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले. ''अण्णासाहेबांच्या कार्याची माहिती प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना कळावी यासाठी शाळांमध्ये हे प्रदर्शन भरवावे व निबंध व वकृत्व स्पर्धा अण्णासाहेबांच्या जीवनावर घेण्यात याव्यात.'', अशी सूचना आमदार अमित गोरखे यांनी केली.
अभिषेक बारणे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे आदिंची यावेळी भाषणे झाली. संभाजी बारणे, नंदू भोगले, वेदांत काळभोर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. डॉ. सीमा काळभोर यांनी आभार मानले.
अण्णासाहेब मगर यांच्या जीवनातील छायाचित्रांचे दुर्मिळ प्रदर्शन ......
अण्णासाहेब मगर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेलेल हे प्रदर्शन अंशुल प्रकाशनचे संचालक विजय जगताप व लेखिका डॉ. सीमा काळभोर यांनी आयोजन केले आहे. प्रदर्शनात अण्णासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांची सुमारे ४५ छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत. बुधवारपर्यंत (ता. २९) हे प्रदर्शन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात सर्वांना विनामूल्य पाहता येईल. शहरवासियांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.