ट्रॅक्टर अपघातात ४६ वर्षीय चालकाचा मृत्यू!

ट्रॅक्टर अपघातात ४६ वर्षीय चालकाचा मृत्यू!

शिरगाव | १ ऑक्टोबर २०२६ : ट्रॅक्टर चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालक ट्रॅक्टर रोडवरून खाली गटारात पडला. या दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ४६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मावळ तालुक्यातील बेबेडोहळ परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मारुती घोटकुले (वय ३२, घोटकुलेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात राजू दत्तू घोटकुले (वय ४६, रा. आढले खुर्द, ता. मावळ, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मौजे बेबेडोहळ, ता. मावळ, जि. पुणे गावच्या हद्दीत आढले खुर्द ते बेबेडोहळ रोडवर घडली.

फिर्यादीनुसार, राजू घोटकुले हे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-14-DH-3708 हा बेबेडोहळ बाजूकडे चालवत घेऊन जात होते. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर हयगयीने आणि अविचाराने चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रोडवरून खाली गटारात गेला.

या अपघातात राजू घोटकुले यांच्या डोक्याला स्टेअरिंगवर आदळून गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories