पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जरांडे यांच्या सहआयुक्तपदी नियुक्तीवर भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात काळभोर यांनी महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांना निवेदन पाठवून जरांडे यांच्या सहआयुक्तपदी नियुक्तीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी निवेदनात म्हटले की, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 20 नोव्हेंबर 2026 रोजीच्या ठराव क्रमांक 6 अन्वये संबंधित नियुक्तीचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नमूद केले की, सहआयुक्तपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे प्रशासकीय पद आहे. या पदावर नियुक्ती करताना संबंधित अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव, सेवाज्येष्ठता, संवर्ग आणि पदोन्नतीचे निकष तपासले जावेत अशी मागणी त्यांनी केली.
तसेच सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जरांडे यांची सहआयुक्तपदी नियुक्ती कोणत्या सेवा नियमांनुसार आणि प्रशासकीय निकषांच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली आहे, याबाबत स्पष्टता असावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखून संबंधित अधिकाऱ्याच्या सेवा विषयक कागदपत्रांची आणि पात्रता प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, असेही काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नियुक्ती प्रक्रियेची सखोल व निष्पक्ष तपासणी करावी. तसेच, हरकतींवर नियमानुसार निर्णय होईपर्यंत नियुक्तीला अंतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. पडताळणीत नियुक्ती प्रचलित सेवा नियम किंवा पात्रतेच्या निकषांशी विसंगत असल्याचे आढळल्यास संबंधित नियुक्तीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी ठाम भूमिका सचिन काळभोर यांनी मांडली आहे. निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याची मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली आहे.