सोमवारी (16 नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड न्यूजमध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने महा इन्फो मीडियाच्या ‘ऑनलाईन नेता’ या डिजिटल प्लॅटफॉर्मने 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सेलिब्रेशनही करण्यात आले. यावेळी संस्थेतील संपादक, पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करत राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रिया गायकवाड मॅडम यांनी पत्रकारितेतील बदलत्या स्वरूपाविषयी भाष्य केले. "समाजात काहीतरी बदल घडवून आणण्याच्या आणि लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने मी पत्रकारितेत आले. मात्र, काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून, डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. या संस्थेत काम करताना डिजिटलायझेशनच्या अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. सरांनी विश्वास ठेवून जबाबदारी दिली. येथे कामाचा आवाका मोठा असून, प्रत्येकाचे सहकार्य मिळत आहे. आपण कोणत्याही एका बाजूने न राहता आपली मते मांडतो, यामध्ये ग्राफिक्स आणि एडिटिंग टीमचेही मोठे योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.
सोनाली बोबडे मॅडमने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सरांनी विश्वासाने चॅनेलची जबाबदारी सोपवली आहे. प्रिया मॅडम आणि विजय सर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असून, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य आहे. सर मला भविष्यातील ज्ञानदा कदम म्हणून संबोधतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असे त्या म्हणाल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड न्यूजचे संपादक विजय जगताप सर यांनी सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी ग्राफिक डिझायनर, एडिटर यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "राष्ट्रीय पत्रकार दिन केवळ पत्रकारांनीच साजरा करायचा असे नाही. पत्रकारितेचे ग्राफिक डिझायनर, एडिटर देखील महत्त्वाचे स्तंभ आहेत. पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीला योग्य आकार देणे, सजवणे आणि वाचकांसमोर प्रभावीपणे सादर करण्याचे काम ते करतात. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले नसले, तरी पत्रकारितेचाच एक अविभाज्य भाग आहेत.
A2M Tech मीडियाचे संचालक, अनिल माने सरांनी देखील सर्वांचे कौतुक केले. त्यांनी पिंपरी-चिंचवड न्यूज चॅनेलच्या वाटचालीवर बोलताना चॅनेलच्या भविष्यातील प्रगतीबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "पिंपरी-चिंचवड न्यूज चॅनेल छोटा नाही. त्याचा पाया आणि फाउंडेशन मोठे आहे. चॅनेलने आतापर्यंत चांगली प्रगती केली असून, येत्या काळात ते आणखी मोठे होईल.