खराबवाडी : खेड तालुक्यातील खराबवाडीत तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला टाके पडल्याची माहिती आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरच्या रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. अक्षय लक्ष्मण पोपाळघट (वय ३०) याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. अक्षय आई तुळजा खानावळ येथे जेवण करत असताना ही घटना घडली. मोहन राजेभाऊ गेटुळकर (वय २९, रा. सारा सिटी जवळ, खरबवाडी) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, अक्षय जेवण करत असताना हल्लेखोर मोहन अचानक मागून आला आणि त्याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मानेवर मारहाण केली. या हल्ल्यात अक्षयच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन चार टाकले पडले आहेत.
या प्रकरणी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक करे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.