हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोतून जगतापांचा प्रवास; वाकडसाठी मास्टर प्लॅन

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोतून जगतापांचा प्रवास; वाकडसाठी मास्टर प्लॅन

पिंपरी-चिंचवड : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 (वाकड चौक ते माण) सुरू झाल्याने हिंजवडीतील आयटी कर्मचारी आणि इतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी उद्घाटनानंतर 4 नोव्हेंबरपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आली. दरम्यान या मार्गिकेच्या कामांचा आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) मेट्रोने प्रवास केला.

या प्रवासादरम्यान जगताप यांनी प्रवासी, आयटी कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध मागण्या जाणून घेतल्या. याशिवाय त्यांनी वाकड मेट्रो स्थानकाचीही पाहणी केली. या मार्गाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना सुलभतेने घेता यावा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध चर्चा करण्यात आल्या.

वाकड मेट्रो स्थानक परिसरात बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था उभारणे, स्थानकापासून सुमारे १० किलोमीटर परिसरात नियमित फीडर बस सेवा सुरू करणे आणि पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत व आंधळे परिसरातील बससेवा मेट्रो स्थानकाशी जोडणे, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

याशिवाय मेट्रो व फीडर बससाठी एकत्रित तिकीट व्यवस्था, सवलतीचे पास, प्रवासाची माहिती देणारे ॲप, सौरऊर्जेवर आधारित बसथांबे आणि मेट्रो-प्रवासी समन्वय समिती स्थापन करण्याबाबतही सूचना मांडण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि सायकलस्वारांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावर भर देण्यात आला.

आमदार शंकर जगताप यांनी "हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ही केवळ आयटी कर्मचाऱ्यांसाठी नसून पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सुविधा असल्याचे सांगितले. यामुळे वाकड स्थानक विकसित झाल्यास परिसरातील अनेक भागांची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी केलेल्या सूचनांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. 

या पाहणीवेळी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories