पुणे जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने कराटे ब्लॅक बेल्टचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुळशी येथील गिरिवन हिल स्टेशनवर हे शिबीर घेण्यात आले होते ज्यामधे 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 19 विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करून त्यांच्या मेहनतीचा आणि कौशल्याचा गौरव करण्यात आला.
या विशेष शिबिरात विद्यार्थ्यांना रोड फाईट, नान चाकू, मॉडर्न वेपन टेक्निक, कराटेमधील आंतरराष्ट्रीय काता, लाठी-काठी अशा विविध प्रकारच्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले. कराटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्वसंरक्षण कौशल्य वाढविण्याचे उद्दिष्ट होते.
शिबिरात नागपूर येथील इंटरनॅशनल शोटो कान कराटे असोसिएशनचे सिहान मिलिंद गोडाम सर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय काता गोजोशिओ शो या प्रकारातील बारकावे समजावून सांगितले. या प्रकाराचे महत्त्व, स्पर्धेत यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली तंत्रशुद्धता, मेहनत आणि सराव याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिरात संस्थापक सदस्य सिहान अशोक कदम यांनी रोड फाईट, वेपन टेक्निक आणि ग्रुप फाईटचे प्रशिक्षण दिले. तर संस्थापक सदस्य सिहान अशोक फरगडे सर यांनी लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण फरगडे सर यांनी शिबिरात परीक्षक म्हणून काम पाहिले.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष तसेच सचिव इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवड, पुणेचे वसंत ठोंबरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठोंबरे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाचे अनेक दाखले देतात. कराटे कलेतही मुलांनी विशेष कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. कोणतीही कला आयुष्यभर शिकावी आणि शिकवावी. ही केवळ कला नसून एक समाजसेवा आणि देशसेवाही आहे. तसेच कराटेमुळे आपले शरीर आणि आरोग्य चांगले राहते." स्वतः वजाज कंपनीमध्ये कार्यरत असताना कमांडो ट्रेनिंग घेतल्याचा अनुभव सांगत, त्या प्रशिक्षणाचा ट्रेकिंगसाठीही फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्टचे वितरण करण्यात आले. यामध्ये 11 मुली आणि 8 मुलांचा समावेश आहे.
ब्लॅक बेल्ट प्राप्त विद्यार्थिनी : आदिती बोले, अस्मी झनकर, राजवी मनियार, जयवी मनियार, ओवी साळुंखे, गौरी शेटे, आरोही झगडे, स्वरा उगले, मनस्वी पाटोळे, सौम्या बसेरा आणि मिहिरा नरदे.
ब्लॅक बेल्ट प्राप्त विद्यार्थी : देवांश ठोंबरे, साहिल ठाकरे, सोहम ठाकरे, साहिल मौला, श्रीकरण पी., विहान डिके, अर्णव राऊत आणि अथर्व पुजारी