५० लाखांच्या खंडणीसाठी रहाटणी येथून व्यापाऱ्याचे अपहरण
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १०० किलोमीटर पाठलाग करुन केली व्यापाऱ्याची सुटका
पिंपरी, ता. ११ - उत्तर प्रदेश पोलिस असल्याचे सांगून चार जणांनी रहाटणी येथील व्यापाऱ्याचे अपहरण करुन ५० लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात घडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक तपास करत १०० किलोमीटर पाठलाग करुन संगमनेर येथे चारही संशयिताना पकडले आणि अपहृत व्यापाऱ्याची सुखरुप सुटका केली. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. चारही संशयित उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले आहे.

सुरेशकुमार बाबूमल जैसवानी (रा. रहाटणी) असे सुटका झालेल्या अपहृत व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात सुरेशकुमार जैसवानी हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर असताना चार संशयित त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला उत्तर प्रदेश पोलिस असल्याचे सांगत चौकशी करायची आहे असे सांगितले. पोलिस असल्याचा धाक दाखवत त्यांनी जैसवानी यांना गाडीत बसण्यास सांगितले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे जैसवानी गोंधळून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र, एका संशयिताने त्यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर, संशयितांनी जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसवले आणि तेथून पसार झाले. यावेळी, परिसरातील लोक तेथे उपस्थित होते. परंतु, अपहरण करणाऱ्यांनी पोलिस असल्याचे भासवल्याने कोणीही हस्तक्षेप केला नाही आणि चौघांनी सहजगत्या जैसवानी यांचे अपहरण केले.
अपहरणानंतर, काही वेळातच संशयितांनी जैसवानी यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या भावाला फोन केला. त्यांनी जैसवानी यांचे अपहरण केल्याचे सांगत ५० लाखांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. या फोननंतर कुटुंबीय घाबरले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. जैसवानी यांच्या भावाला विश्वासात घेऊन संशयितांशी फोनवर संपर्क कायम ठेवण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. कॉल लोकेशनच्या आधारे संशयित शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत सुमारे १०० किलोमीटरचा पाठलाग केला. तपासादरम्यान संशयित संगमनेर परिसरातून पुढे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि चारही संशयितांना पकडून जैसवानी यांची सुखरूप सुटका केली.
प्राथमिक तपासामध्ये चारही संशयित उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले आहे. खंडणीसाठी त्यांनी अपहरणाचा कट रचल्याचे त्यांनी पोलिसांनी दिली आहे. जैसवानी यांच्या अपहरणाची ही घटना रहाटणी येथील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.