news
clock

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार - सभापती संजय नाना काटे

शहर सुधारणा समितीच्या बैठकीत आरोग्य, झोपडपट्टी, पर्यावरण, स्वच्छता आदी विषयांचा सविस्तर आढावा

पिंपरी, ता. १० - ''पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत.'', अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली.

शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात समितीचे सभापती संजय नाना काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहर विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर-लोंढे, नगरसदस्या वैशाली काळभोर, अर्चना सस्ते, नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंह बन्सल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियमित साफसफाई, कचरा संकलन व कचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात यावा. तसेच शहरातील व्यापार व उद्योगांना आवश्यक असलेल्या परवानग्या पारदर्शक व सुलभ पद्धतीने देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित विभागांना सभापती काटे यांनी केल्या. 

मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या कामाला गती देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊन पर्यावरण संवर्धनासही मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. विकास आराखड्यासंदर्भातील (डीपी)  हरकती व सूचना लवकरात लवकर निकाली काढून नियोजनबद्ध विकास साधण्यावर भर दिला जावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे, पात्र लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देणे, गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत पोहोचविण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. याशिवाय शहरातील नद्यांच्या काठावरील अतिक्रमणे हटवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories