तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २१ हजार रुपयांचा गांजा जप्त
पिंपरी, ता. २४ - तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला गुरुवारी (ता. २३) अटक केली आहे. रुपये २१ हजार १०० किंमतीचा ४२६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता सोपान बधाले (वय ५६ वर्षे, रा. बधलवाडी, ता. मावळ) याने बेकायदेशीर गांजा विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत त्याच्या ताब्यातून गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ७.५० च्या सुमारास नवलाख उंब्रे ते बधलवाडी रोडवरील मुक्ताई मंदीराच्या जवळ तो पोलिसांना सापडला.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गांजा कुठून आणला याबाबत पोलिसांच्या चौकशीला कोणतीही माहिती दिली नाही. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (११) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.