महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील रेल्वे प्रकल्पांना केंद्रसरकारची मंजुरी
पिंपरी, ता. २५ - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील ८ जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन मल्टिट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च ९ हजार ०७२ कोटी इतका आहे, अशी माहितील सूत्रांनी दिली.
सदर, तीन प्रकल्प मिळून भारतीय रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये ३०७ किलोमीटरची वाढ करतील. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील ८ जिल्ह्यांना जोडतील.
मुख्यतः गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून सुरु होऊन मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत जातो. हा प्रकल्प सुमारे २३१ किलोमीटर लांबीचा आहे आणि त्याचा खर्च अंदाजे ५ हजार २३६ कोटी आहे. इतर दोन प्रकल्प हे बिहारमधील पुनारख-किऊल तिसरी आणि चौथी लाइन असून त्यासाठी २ हजार २६८ कोटी रुपये आणि झारखंडमधील गम्हारिया-चांडिल तिसरी आणि चौथी लाइन प्रकल्पासाठी १ हजार १६८ कोटी रुपये खर्च आहे. गोंदिया-जबलपूर प्रकल्पामुळे दक्षिण भारत (चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद) ते प्रयागराज-वाराणसी-बिहारपर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल. यामुळे कान्हा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क आणि धुआंधार धबधबा सारख्या पर्यटन स्थळांना चालना मिळेल.
नवीन रेल्वेप्रकल्पांची वैशिष्ट्ये -
- रेल्वे मार्गाची क्षमता वाढेल, वाहतुकीची गती आणि कार्यक्षमता सुधारेल.
- एकूण ५ हजार ४०७ गावे जोडले जातील, ज्यामुळे सुमारे ९८ लाख लोकसंख्येला थेट लाभ मिळेल.
- स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील.