news
clock
चापेकर बंधू म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील तीन क्रांतीफुले -  डॉ. नीता मोहिते

चापेकर बंधू म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील तीन क्रांतीफुले - डॉ. नीता मोहिते

चापेकर बंधू म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील तीन क्रांतीफुले -  डॉ. नीता मोहिते

क्रांतीवीर चापेकर व्याख्यानमालेचा निगडी-प्राधिकरणात प्रारंभ  

पिंपरी, ता. १७ - ''भारतभूमी ही अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने पवित्र झालेली भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणारी आणि क्रांती घडवणारी तीन क्रांतिफुले म्हणजे चापेकर बंधू आहेत.'' असे गौरवोद्गार डॉ. नीता मोहिते यांनी काढले. क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांचा स्मृतीदिन १८ एप्रिलला असतो. त्यानिमित्त क्रांतीवीर चापेकर समितीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी  'क्रांतीवीर चापेकर व्याख्यानमाला' आयोजित केली जाणार आहे. या व्याख्यानमालेचा प्रारंभ  'क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण' या विषयावरील  डॉ. नीता मोहिते यांच्या व्याख्यानाने झाला. निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळांच्या प्रांगणात हे व्याख्यान झाले. 

यावेळी पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ शास्रज्ञ व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, डॉ. शंकुतला बन्सल, आसराम कसबे, सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हे व्याख्यान ऐकण्यासाठी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शर्मिला बाबर यांनी व्याख्यानमालेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

 'क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण' हा विषय मांडताना डॉ. नीता मोहिते यांनी सन १८५७ ला क्रांतीची पहिली ठिणगी पडली त्या घटनेपासून ते क्रांतिवीर चापेकरांना ब्रिटीश सरकारने दिलेल्या फाशीच्या घटनेपर्यंतचा इतिहास सविस्तरपणे उलगडला. क्रांतिवीर चापेकर बंधूंनी वेगवेगळ्या गुप्त पद्धतीने ब्रिटीश सरकारला कसे जेरीस आणले हे सांगताना पुण्यातील हत्यारे मिळविणे, मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास डांबर फासणे, हिंदूधर्मविरोधी कार्य करणार्‍या लोकांना साम, दाम, दंड, भेद या मार्गांनी धडा शिकविणे, प्लेगच्या साथीत मॅट्रिक परीक्षा सक्तीची केल्यावर ब्रिटीशांनी टाकलेला परीक्षा मंडप पेटवून देणे... असे अनेक प्रसंग सांगितले. अशा व्याख्यानमालेतून  क्रांतिवीर चापेकर बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शौर्यकथा तरुण पिढीला समजल्या पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. मोहिते यांनी व्यक्त केली.

डॉ. अशोक नगरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ''क्रांतिकारकांच्या सशस्र लढ्याने स्वातंत्र्य मिळवलेला भारत देश आता सकारात्मक दिशेने बदलत आहे. संरक्षणदलातील क्षेत्रात प्रगती करत आहे ही समाधानाची बाब असली तरी दहशतवादी कारवाया समूळ नष्ट करणे हे जगातील मोठे आव्हान आहे.'' 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता घोडे यांनी केले. आसराम कसबे यांनी आभार मानले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले. शुभदा कानडे, योगेश्वरी महाजन, प्रज्ञा फुलपगार यांच्या चापेकर स्तवन गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे , समर्थ डोंगरे, सागर शेवाळे आणि किरण गायकवाड यांनी संयोजन केले. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories