चिंबळीत गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

चिंबळीत गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

चिंबळी | १ ऑक्टोबर २०२६ : चिंबळी येथील बर्गे वस्ती परिसरात २९ वर्षीय तरुणाकडे विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीत हे पिस्तूल आणि काडतूस दुसऱ्या तरुणाकडून घेतल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर रोहिदास खराडे, पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अमोल संभाजी गायकवाड (वय २९, सध्या रा. बर्गे  वस्ती, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. माहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) आणि महेंद्र दिलीप कोळी (वय २७, सध्या रा. मुटकेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे; मूळ जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास बर्गे वस्ती, चिंबळी येथे खदानीजवळ करण्यात आली.

फिर्यादीनुसार, अमोल गायकवाड याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अनधिकृतपणे, विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या बाळगताना मिळून आला. पिस्तूल आणि काडतूस कोठून आणले याबाबत विचारणा केली असता ते महेंद्र दिलीप कोळी याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयाकडून २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी आदेशानुसार ३० सप्टेंबर रोजी रात्री ००.०१ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत लागू असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अंतर्गत आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांच्या नोंदीत म्हटले आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories