चिंचवड | १ ऑक्टोबर २०२६ : दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन महिलांनी चिंचवड पोलीस ठाण्यात आरडाओरडा करून स्वतःला जखमी केले तसेच तपासात दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांना पाहून घेण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये ३५ वर्षीय महिला आणि ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारी २१ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. दोघीही चव्हाणनगर, देहूगाव येथील रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९२/२०२६ मधील पाहिजे आरोपी अभिषेक लालमन यादव आणि त्याच्या स्टाफला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संबंधित दोन महिलांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी क्रमांक एकची आई आणि आरोपी क्रमांक दोनची बहीण या चिंचवड पोलीस ठाण्यात येऊन अभिषेक यादव याच्या अटकेस अडथळा निर्माण व्हावा या उद्देशाने आरडाओरडा करू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक दोनने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून स्वतःच्या अंगावरील टी-शर्ट काढला, तर आरोपी क्रमांक एकने लोखंडी रेलिंगला स्वतःचे डोके आदळून स्वतःला जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे.
तसेच गुन्ह्याच्या तपासात दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने कामात अडथळा आणला व तुम्हा सर्व पोलिसांना पाहून घेईन व सर्वांच्या नोकऱ्या घालवील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.