आळंदी | २ ऑक्टोबर २०२६ : दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांची पाहणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याची नोंद आढळून न आल्याने विनर्स अकॅडमीची मिळकत नगरपरिषदेने सील केली आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमी सुरू असलेल्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकॅडमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.
नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता संबंधित आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू कायदे आणि नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकॅडमीची संबंधित मिळकत सील करण्याची कारवाई केली. या कारवाईवेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.
संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे आळंदी नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.