पिंपरी-चिंचवड | २७ नोव्हेंबर २०२६ : राज्यातील संकटग्रस्त नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी गुरूवारी(26 नोव्हेंबर) भेट घेतली. त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी उद्योजक शिवराज काटे उपस्थित होते.
या मदतीचे विशेष महत्त्व म्हणजे महापौर लांडगे यांनी ही मदत वैयक्तिक स्तरावर केली आहे. सार्वजनिक पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच संकटग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःच्या उत्पन्नातून आर्थिक योगदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
महापौर रवि लांडगे यांनी यापूर्वीही मोशी येथील दुर्घटनेनंतर सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली होती.
मोशी दुर्घटनेनंतर स्थानिक पातळीवर मदतीसाठी घेतलेल्या पुढाकारानंतर आता राज्यातील संकटग्रस्त नागरिकांसाठीही लांडगे यांनी वैयक्तिक आर्थिक योगदान दिले आहे.
लोकप्रतिनिधींकडून संकटग्रस्तांना शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, या मदतीपेक्षा महापौर लांडगे यांचे पाच लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान वेगळे ठरते. त्यांच्या या कृतीतून संकटग्रस्त नागरिकांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वचा दृष्टिकोन अधोरेखित होतो.