आळंदीमधील आध्यात्मिक गुरुकुल संस्थेविरुद्ध तक्रार, संस्थेतील २१ बालकांची पुण्यातील निवारागृहात रवानगी
पिंपरी, ता. १० - आळंदी येथील शिवछत्रपती आध्यात्मिक गुरुकुल संस्थेत बालकांचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करुन २१ बालकांची पुण्यातील दोन निवारागृहात रवानगी केली. महिला व बालविकास आयुक्तालय, पोलिस प्रशासन व आळंदी नगरपरिषदेने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
आळंदीतील शिवछत्रपती आध्यात्मिक गुरुकुल संस्थेबाबत चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक - १०९८ वर तक्रार आली होती. त्यावर बालकल्याण समितीच्या सदस्या संध्या गायकवाड, अॅड. परेश खाडिलकर, सारिका आगज्ञान आणि नंदिता अंबिके यांनी संस्थेच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर व पोलिस प्रशासनाने रविवारी (ता. ८) संस्थेची पाहणी केली. तेथे सुविधांचा अभाव आणि अनुचित प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार नगरपरिषदेने
२१ पैकी ६ बालकांना पुण्यातील 'साथी' तर १५ बालकांना 'साई' या खुल्या निवारागृहात स्थलांतरित केले आहे. स्थलांतरापूर्वी सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
तपासामध्ये संस्थेची चारमजली इमारत अनधिकृत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नगरपालिकेकडे केवळ ४२० चौरस फुटांची नोंद असून, उर्वरित बांधकाम नियमबाह्य असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.