पिंपरी-चिंचवड | ७ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-४ने पेट्रोलिंगदरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन केलेल्या तपासातून दोन घरफोडी आणि दोन वाहनचोरी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या आदेशाने ६ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट-४चे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ऋषिकेश राजेंद्र भोसले (वय २५) अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि इतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन डिलक्स मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांबाबत पोलिसांनी तपास केला असता चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोड्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या तपासातून उत्तर चाकण पोलीस ठाणे , उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे तसेच चिखली पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
यातील एका आरोपीला पुढील कारवाईसाठी उत्तर चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, अन्य आरोपींबाबत उत्तर म्हाळुंगे पोलिसांकडून पुढील वैद्यकीय तपासणीसह कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.