सायबर फसवणूकीच्या टोळीतील २५ वर्षीय आरोपीला आळंदी पोलिसांकडून अटक
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - देशातील विविध राज्यातील नागरीकांना गुंतवणूक व इतर गैरव्यवहारांमध्ये अडकवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या टोळीतील २५ वर्षीय गुन्हेगाराला आळंदी पोलिसांनी मोशी येथून अटक केली. त्याने या टोळीद्वारे देशभरातील एकूण ६५ नागरिकांची एकूण १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
आळंदी पोलिस ठाण्यात स्थापन केलेल्या सायबर सेलने म्यूल अकाउंटच्या अनुषंगाने माहिती काढत असताना आरोपी सचिन संजय काळे याने आळंदी येथे असलेले बचत खाते हे ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून मिळवलेली रक्कम प्राप्त करण्यासाठी वापरत असल्याची माहिती मिळाली होती यावरून आळंदी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते.
आरोपीने स्वतःच्या नावे वेगवेगळया बँकेमध्ये एकूण ९ बॅंक खाती उघडली आणि आळंदीतील खाते हे सायबर फसवणुकीत आलेली रक्कम स्वतःच्या खात्यावर घेऊन ती एटीएम तसेच चेकच्या माध्यमातून काढली आहे. भारतातील विविध राज्यातील एकूण ६५ नागरिकांची १५० कोटी रुपये इतकी रकमेची फसवणूक झाली असल्याचे एनसीसीआरपी पोर्टल वरती उपलब्ध माहितीवरुन समोर आले. सदर रकमेपैकी आरोपी सचीन काळे याचे विविध ९ बैंक खात्यात १ कोटी १५ लाख रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी सचिन काळे याला अटक केली असून त्याच्याकडे इतर सहआरोपींबाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. शशीकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), बसवराज तेली (अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग), सारंग आव्हाड, (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे), मारुती जगताप (पोलिस उपायुक्त, परिमंडळ - ३), योगेश रांजनकर (सहाय्यक पोलिस आयुक्त चाकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. नरके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), तुकाराम खडके (पोलिस उपनिरीक्षक), हवालदार आरती निकम, पोलिस शिपाई सोळंके, जगताप यांनी केले आहे.
आवाहन - कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या नावे असलेले बँक खाते किंवा सिमकार्ड वापरण्यास देऊ नये तसेच अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाईन स्वपरुपात पैसे स्वीकारुन रोख स्वरुपात पैसे एटीएममधून किंवा चेकद्वारे काढून देऊ नयेत, सदरची रक्कम ही ऑनलाईन फसवणुकीमधील असू शकते, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.