दिवेआगर | 1 ऑक्टोबर 2026 : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, तालुका श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी आळंदी, जिल्हा पुणे येथून पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अकॅडमीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व मृतदेह सापडले असून पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे 11वी-12वी विज्ञान शाखेतील 40 हून अधिक विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी काही विद्यार्थी पाण्यात उतरले.
समुद्रातील पाण्याची खोली आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने 8 विद्यार्थी खोल पाण्यात वाहून गेले. स्थानिक नागरिक व पर्यटकांच्या मदतीने तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे मालक भाऊ मारुती साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्रात शोधमोहीम राबवली. त्यांच्या मदतीने आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मृत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
- यश किरण वानखेडे
- सोहम तुकाराम भांडवलकर
- तन्मय दत्तात्रय वाहिले
- कौस्तुभ संदीप दौंड
- कैवल्य वासनकर
- राजवीर वाहिले
- प्रणव बनसोडे
- सुमित अहिरे
घटनास्थळी पोलीस, महसूल विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. मृतदेहांची ओळख, पंचनामा तसेच आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या, समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आणि दुर्घटनेची संपूर्ण परिस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास व कार्यवाही केली जात आहे. ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, अधिकृत तपशील प्राप्त झाल्यानंतर वृत्त अद्ययावत करण्यात येईल.