पिंपरी | १ ऑक्टोबर २०२६ : मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ऑक्टोबर रोजी ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’, तर ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, अभिवाचन, नाटक, संगीत, एकांकिका, लोककला, लावणी आणि गझल अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाउत्सवाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘गाणी मंगेशकरांची’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. याशिवाय अशोक हांडे यांचे ‘मंगलगाणी दंगलगाणी’, संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’, सचिन खेडेकर अभिनीत ‘भूमिका’, भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ यांसह अनेक कार्यक्रम सप्ताहात होणार आहेत.
महापालिकेने शहरातील विविध भागांत कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, चिखली टाऊन हॉल आणि ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असतील.
यासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कला दालनात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन मराठी भाषा संवर्धनाची लोकचळवळ अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले आहे.