विकास आराखड्यावरील हरकतींवरील सुनावणीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना
पिंपरी, ता. ११ - महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या सुधारीत प्रारुप विकास आराखड्यावर (डीपी प्लॅन) नागरिकांनी ५० हजार हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापना केली आहे.
या समितीत स्थायी समितीतील आणखी तीन सदस्य घेण्यात येतील. महापालिकेच्या फेब्रुवारीच्या तहकूब सभेत विकास आराखड्यावर सुनावणी घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर नगररचना विभागासह प्रशासनाने तातडीने आठ महिन्यांनंतर सुनावणीसाठी समितीची स्थापना केली. त्यात नगररचना विभागाचे निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, निवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार, निवृत्त उपसंचालक उत्तरेश्वर लोंढे, पर्यावरण अभियंता नरसू शिंदे या चार तज्ज्ञांचा समावेश आहे.
महापालिकेने प्रशासकीय राजवटीत शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करुन १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत सूचना व हरकती मागविल्या. डीपीच्या विरोधात तब्बल ५० हजार हरकती प्राप्त झाल्या होत्या.