एकट्याने लेकरांचा सांभाळ करताना त्रासलेल्या बापाने लेकरांचाच गळा दाबला, मुलीचा मृत्यू व मुलगा बचावला
एकट्याने लेकरांचा सांभाळ करताना त्रासलेल्या बापाने लेकरांचाच गळा दाबला, मुलीचा मृत्यू व मुलगा बचावला
पुणे, ता. ८ - एकट्याने लेकरांना संभाळणे जमत नसल्याने वडीलांनीच आपल्या लेकरांचा गळा दाबलाय. या घटनेत तीन वर्षाची चिमुकली लेक मरण पावली आहे आणि पाच वर्षाचा मुलगा वाचला आहे. पत्नी मुलांना व पतीला सोडून माहेरी गेल्याने त्रासलेल्या पतीने हे अतिशय वाईट पाऊल उचलले. पोटच्या लेकरांचा सर्वनाश करणाऱ्या या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. सागर शिंदे (वय २९ वर्षे, रा. गायकवाड वस्ती, मोशी) त्याचे नाव आहे. ही घटना जुन्नर तालुक्यात आळे खिंड येथे मंगळवारी (ता. ५) घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरला आर्यन व हर्षदा ही दोन मुले होती. सागरची पत्नी त्याला आणि मुलांना सोडून सात महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली आहे. एकट्याने मुलांचा सांभाळ करणे सागरला जमत नसल्याने तो वैतागला होता. मुलांना फिरायला नेतो, असे घरी सांगून सागर दोन्ही मुलांना घेऊन नाशिकला गेला होता. मंगळवारी (ता. ५) तेथून परत येताना आळे खिंड येथे एसटी बस थांबल्यानंतर सागर मुलांना घेऊन खाली उतरला. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने दोन्ही मुलांना जवळच्या जंगलात नेले आणि निदर्यीपणे आधी आर्यनचा गळा दाबला. निपचित पडलेला आर्यन मरण पावला असे समजून सागरने त्याला तिथेच सोडले. नंतर मुलगी हर्षदाचा गळा दाबला व ती मरण पावली. तिचा मृतदेह घायपाताच्या झुडपात फेकला. तेथून तो मोशीला गेला.
काही वेळाने निपचित पडलेला आर्यन शुद्धीवर आला आणि जंगलातून चालत आळे परिसरात आला. एक लहान मुलगा रस्त्यावर फिरत असल्याची माहिती तेथील पोलिसांना समजली. त्यांनी आर्यनकडे विचारपूस केली असता, ‘वडील मला आणि बहिणीला घेऊन आले होते. त्यांनी मला रात्री जंगलात सोडले आणि बहिणीला घेऊन ते निघून गेले,’ इतकेच त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आळे फाटा पोलिस ठाण्यात नेले. आळेफाटा पोलिसांनी आर्यनकडे पुन्हा विचारपूस केली. त्याच्या आजोबांचा मोशीतील पत्ता शोधून त्यांना आळेफाट्याला बोलावून घेतले. मुलांचा गळा दाबल्यानंतर, सागर मोशीला गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचे कपडे बॅगेत भरुन तो बाहेर निघाला. ‘चाकणला बालाजीनगरमध्ये खोली घेतली असून, तिथेच मुलांना ठेवले आहे,’ असे त्याने वडिलांना सांगितले व तो घरातून निघून गेला. दरम्यान, दोन्ही मुले हरवल्याची तक्रार भोसरी पोलिसांत देण्यात आली होती.
पोलिसांनी तपास करुन निदर्यी बाप आरोपी सागर शिंदे याचा शोध घेतला, तो भोसरीत एका पानटपरीजवळ सापडला. पोलिसांनी त्याला पकडून आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत आपणच दोन्ही मुलांचा गळा आवळल्याची कबुली सागरने दिली. हा तपास पोलिस पाटील गंगाधर चौगुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव, सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केला.