पीएमपीएमएल'च्या 'वर्षा सहल' विशेष पर्यटन बस सेवेचे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन
'पीएमपीएमएल'च्या 'वर्षा सहल' विशेष पर्यटन बस सेवेचे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - पुणे महानगर परिवहन महामंडळच्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मार्ग क्र. ९ (अ) ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचे उद्घाटन नुकतेच स्वारगेट येथील बसस्थानकात पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले.
या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंट अशा आकर्षक पर्यटनस्थळांचा सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी प्रवास 'पीएमपी'कडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, "'पीएमपीएमएल'चा हा उपक्रम पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. सुरक्षित, किफायतशीर आणि नियोजनबद्ध पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.'' पुणे महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविकांनी देखील या विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांच्यासाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात यावे," अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी 'पीएमपीएमएल'चे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सदर कार्यक्रमास वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच पीएमपीएमएल'चे अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.