प्रारूप विकास आराखड्याच्या ५० हजारांहून अधिक हरकतींवर सुनावणी सुरू, पहिल्या दिवशी २०८ हरकतींवर सुनावणी
प्रारूप विकास आराखड्याच्या ५० हजारांहून अधिक हरकतींवर सुनावणी सुरू, पहिल्या दिवशी २०८ हरकतींवर सुनावणी
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराच्या बहुचर्चित प्रारूप विकास आराखड्यावर (डीपी) दाखल झालेल्या ५० हजारांहून अधिक हरकती आणि सूचनांवरील सुनावणीला सोमवारी (ता. ३) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी एकूण २०८ हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ही सुनावणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.
महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या सुधारित विकास आराखड्यावर शहरातील नागरिक, जमीनमालक तसेच विविध संस्था आणि घटकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर आता संबंधित हरकतदारांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतले जात आहे. सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांचा विचार करून पुढील निर्णयप्रक्रिया राबविली जाणार आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशी झालेल्या सुनावणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भीमसृष्टी मैदानाच्या आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सुधारित विकास आराखड्यात भीमसृष्टी मैदान परिसरातील सर्व्हे क्रमांक २/२० येथे पोलीस स्टेशन आणि सर्व्हे क्रमांक २/२१ मध्ये बस टर्मिनलसाठी प्रस्तावित आरक्षण असल्याची हरकत नोंदविण्यात आली आहे.
संबंधित आरक्षणे रद्द करून भीमसृष्टी मैदान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोकळी जागा म्हणून राखीव ठेवावे, अशी मागणी हरकतीत करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी हा परिसर श्रद्धेचे केंद्र असल्याने त्याचे सांस्कृतिक महत्त्व कायम ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली.
तसेच भीमसृष्टी परिसरातील तार कंपाऊंड केलेल्या सर्व्हे क्रमांक २/२१ मधील ‘म्युनिसिपल पर्पज’(MP)व अन्य प्रस्तावित आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी माता रमाई स्मारकासाठी मोकळ्या जागेचे आरक्षण प्रस्तावित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सोमवारच्या सुनावणीवेळी प्रारूप विकास आराखडा समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.