पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (ता. ४) कोल्हापूरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शिक्षणक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होणार आहे. कसबा बावडा येथील डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करुन विविध ज्ञानशाखांचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले, त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान फार मोठे होते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT) या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्यांच्या 'डी. वाय. पाटील ग्रुप' अंतर्गत ७ पेखा जास्त अभिमत/खाजगी विद्यापीठे आणि १५० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. सध्या डॉ. डी. वाय. पाटील समूहाअंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० हून अधिक शिक्षण संस्थांचे जाळे पसरलेले आहे. अभियांत्रिकी (Engineering), वैद्यकीय (Medical), फार्मसी, व्यवस्थापन (Management), आर्किटेक्चर आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत या संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी विशाल कार्य केले. डॉ. डी. वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. ते त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. सन १९७८ च्या निवडणुकीत डॉ. डी. वाय. पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांचे पुत्र डॉ. संजय पाटील, माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील तसेच कन्या प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर हे सर्वजण शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. तर त्यांचे नातू, माजी आमदार ऋतुराज पाटील हे देखील सार्वजनिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत.
राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.